पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले – अमित शहा
विंग येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ विराट सभा उत्साहात

कराड / प्रतिनिधी : –
50 वर्षे सत्तेत असताना, तसेच केंद्रात दहा वर्षे मंत्रिपदे भुषवणाऱ्या शरद पवार आणि प्रधानमंत्री कार्यालयात मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी काय केले. काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष खरगे हे त्यांच्या नेत्यांना लोकांना शब्द देताना तो पूर्ण करता आला पाहिजे हे समजून द्या, असे सांगतात. मग असा पक्ष कराड दक्षिणचा विकास काय करणार. मात्र, महायुतीचे सरकारमध्ये तुम्ही अतुलबाबांना विजयी करून पाठवल्यावर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला पक्के घर देऊन झोपडपट्टी हटवणार. तसेच त्याच्या उद्घाटनाला मी कराडला येणार असल्याचा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.
विंग (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
अमित शहा म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या झेंड्याखाली भाजप – शिवसेनेने निवडणूक लढवली. परंतु, 370 कलम आणि राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी विश्वासात केला. हिंदुत्वाला ठोकर मारत हिंदुत्वाला आतंकवादी म्हणणाऱ्या माणसांसोबत गेले. मात्र, आम्ही यावेळेला ती चूक करणार नाही. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळेल.
राहुल गांधींचा समाचार घेताना ते म्हणाले, अग्निवीरांबाबत चुकीचे बोलणाऱ्या राहुल गांधींच्या भूल थापांना युवकांनी बळी पडू नये. त्यांच्याप्रमाणे खोटे वायदे न करतात आम्ही महाराष्ट्रातील सर्व अग्निवीरांना केंद्र व राज्य सरकारची पेन्शनची नोकरी देणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सातारा ही वीरांची भूमी असून येथील वीरांना आणि वीरमातांना मी प्रणाम करतो. मोदींनी ‘वन रँक वन पेन्शन’च्या माध्यमातून एक लाख 55 हजार कोटी जवानांच्या खात्यावर जमा केलेत.
ते म्हणाले, भाजपच्या माध्यमातून कराडला प्लाय ओव्हर ब्रिज होत आहे. अतुलबाबांच्या कृष्णा हॉस्पिटल, साखर कारखाना, बँक पतसंस्था आदी सहकारी संस्थांच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती झाली आहे. आता राज्य सरकारही कराड दक्षिणमध्ये मोठी गुंतवणूक करणार करणार असून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
मोदींनी शंभर कोटी गरिबांना पक्के घर देण्याचे काम केले. तसेच समृद्धी महामार्ग, मुंबई – पुणे कॉरिडॉर, अटल सेतू, मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो, कृष्णा निरा नदी योजना असल्यास अनेक विकास कामे केली. परंतु, शरद पवारांनी आघाडीच्या माध्यमातून एक काम केल्याचे सांगावे. यूपीए सरकारच्या काळात दहा वर्षांमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार करोड दिले. मात्र, मोदींनी दहा वर्षात 10 लाख 15 हजार 890 करोड रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले. आता कराड दक्षिणलाही मोठा विकासनिधी मिळणार असून मोदींचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही अतुलबाबांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, नरेंद्र मोदी आणि महायुती कडून युवकांना मोठे अपेक्षा आहे. त्यानुसार कराडची एमआयडीसीला फाईव्ह स्टारचा दर्जा द्यावा, येथील सहकारी सिंचन योजना पुनर्गठित करावी, येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरालगत असलेल्या झोपडपट्टीवाशीयांची दहा वर्षांपासून पक्क्या घरांची मागणी आहे. परंतु, ती त्यांना पुढे पूर्ण करता आली नाही. मात्र आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून कराडच्या स्टेडियमलगत, पाटण कॉलनी तसेच मलकापुरातील झोपडपट्टीवाशीयांची पक्की घरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
डॉ. अतुल भोसले यांना मोठे मताधिक्य द्या
गत विधानसभेत डॉ. अतुल भोसले यांना केवळ साडेचार हजार मते कमी मिळाल्याची सल आजही मनात आहे. या निवडणुकीत तुम्ही ती कसर भरून काढत त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा, मी त्यांना मंत्रीपद देण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. याप्रसंगी डॉ. अतुल भोसले यांनी मागच्या निवडणुकीतील कसर भरून काढत कराड दक्षिणमध्ये कमळ फुलवणार असल्याचा विश्वास ना. अमित शहा यांना दिला.