शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार – इंद्रजीत गुजर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारी, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात

कराड/प्रतिनिधी : –
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खा. राजू शेट्टी यांनी अनेक आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. अशा संघटनेत काम करताना शेतकऱ्यांसाठी काहीतरी योगदान देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मत माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांनी व्यक्त केले.
इंद्रजीत गुजर यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्यासह घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. गुजर म्हणाले, आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. सर्वसामान्य लोकांच्याही अनेक समस्या आहेत. तसेच आपल्या भागातील युवकांना नोकरी, व्यवसायासाठी इतरत्र जावे लागते. मात्र, त्यांना याच ठिकाणी नोकरी मिळावी. उद्योग, व्यवसाय करता यावा. यासाठी आपण प्रयत्नशील असून कराड तालुक्यात उद्योग, व्यवसायाच्या, तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.