आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामनोरंजनसातारा जिल्हाहोम

मर्चंट सेवक गौरव विशेषांक ‘सेवानंद’ चे प्रकाशन इंद्रजीत देशमुख यांचे हस्ते संपन्न

कराड / प्रतिनिधी : –

मर्चेंट परिवार गेल्या ३९ वर्षापासुन बँकींगच्या रुपाने सामाजिक सेवा देत असताना कराड मर्चेंट, महिला मर्चेंट या संस्थानी आपली एकवेगळी ओळख समाजात निर्माण केलेली आहे. या कार्यात मोलाचा वाटा सेवकांचा आहे, त्याची पोहोचपावती म्हणुन मर्चेंट कुटुंब प्रमुख सत्यनारायण मिणीयार यांचे संकल्पनेतुन सेवकांचा उचित गौरव करणेचे हेतुने मर्चेंट सेवक गौरव विशेषांक सेवानंद निर्मीती करणेत आली आहे. या मर्चेंट सेवक गौरव विशेषांक ‘सेवानंद’ चे प्रकाशन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांचे शुभहस्ते व सुरेश उमाप (शिवमुद्रा फाऊंडेशन पुणे) दिलीप गुरव (मुख्य कार्यकारी अधिकारी कराड अर्बन बँक कराड) यांचे उपस्थितीत अर्बन शताब्दी सभागृह कराड येथे पार पडले.

यावेळी बोलताना इंद्रजित देशमुख यांनी सांगितले की, कोणत्याही ठिकाणी सेवा बजावत असताना काही मुल्य जपली पाहिजेत. यामध्ये यशस्वी होणेकरिता प्रत्येक काम तत्परतेने केले पाहिजे. तसेच आपण केलेल्या कामाच्या परिणामावर लक्ष ठेवुन प्रभावी अमंलबाजवणी करत नेमक्या कामाला प्राथमिकता देत कायमस्वरुपी संवाद कौशल्याचा वापर करता आला पाहिजे. नवनविन नियमावली आत्मसात केली पाहिजे. यशस्वी माणसांचे यशाचे गमक हे त्यांच्या दुसऱ्याचे मत ऐकून घेण्याच्या व होय हे मी करु शकतो या गुणात आहे, ते समजुन घेणे गरजेचे आहे.

श्री. मिणीयार यांच्या सारखे नेतृत्व तुम्हाला लाभले आहे हे तुमचे भाग्य असून त्यांनी केलेल्या कामात उत्कृष्ट संस्था निर्मीती, सामाजिक दातृत्व एक कर्तृत्व संपन्न नेतृत्व पहायला मिळते. त्यांचा तुम्ही आदर्श घ्यावा.

यावेळी सुरेश उमाप यांनी सांगितले की, या जगतामध्ये लोकांच्या हाताला काम देणे यापेक्षा मोठं काम होवुच शकत नाही. कराड मर्चेंट संस्थेने त्यांचे सेवकाचे साथीने उद्योजकीय साहित्य संमेलनासारखे अनेक स्तुत्य उपक्रम राबिविले आहेत. त्यात त्यांचे कामाची तळमळ दिसुन येते.

प्रकाशन प्रसंगी बोलताना कराड अर्बन बँकेचे दिलीप गुरव यांनी सांगितले की, मर्चेंट ग्रुपचा आणि माझा जवळचा संबंध असून या संस्थाकडे आम्ही आमचे लहान भाऊ म्हणुनच पाहतो. मर्चेंट संस्थेचे सर्व कर्मचारी प्रामाणिक व कामात चिकाटी असणारे आहेत. मर्चेंट ग्रुप हा श्री. मिणीयार यांनी स्थापन केला, परंतु यात एका कबड्डी खेळाडुने स्थापन केलेली एकमेव संस्था असुन ती त्यांनी पराजयाने कधी खचुन न जाता व विजयाने कधी हुरळून न जाता खेळाडु वृत्तीने चालविलेली आहे. त्यांचे काम खेळात जसा कॅप्टन असतो व जो सर्वांना बरोबर घेवुन जातो त्याप्रमाणे असून ते आपल्या सेवकांना कामाचे संपुर्ण श्रेय देतात. त्यामुळे ते पितामह नेतृत्व सिध्द होत आहे. प्रत्येक सेवकांनी यात लिहलेल्या लेखात खऱ्या परस्थितीचे विवेचन केलेले आहे. त्यामुळे अंकाच नाव ‘सेवानंद’ हे सार्थ होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ सभासद डी. एच. कुलकर्णी यांनी केले. यानंतर विशेषांकाचे रचनाकार धनंजय कुलकर्णी यांचा सत्कार करणेत आला. तसेच उप मुख्यकार्यकारी अधिकारी बाजीराव यादव यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. उपस्थितांमधुन जेष्ठ सभासद महादेव साने यांनी सेवकांच्या प्रामाणिक व कर्तव्य तत्पर सेवेबद्दल सेवकांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या वेळी महिला मर्चंट च्या संस्थापिका सौ भारती मिणीयार यांना त्यांचे वाढदिवसानिमीत्त मान्यवराकडुन शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी संस्थेचे सेवक सतिश जगदाळे यांनी आभार मानले. तसेच विविध क्षेत्रात पदे भुषविलेल्या माजी सेवक यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला. या प्रकाशन सोहळ्यास मर्चेंट कुटुंब प्रमुख सत्यनारायण मिणीयार, कराड मर्चेंटचे चेअरमन माणिकराव पाटील, व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, महिला मर्चेंटच्या चेअरमन सौ. कविता पवार, व्हा. चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले, सर्व संचालक, दोन्ही संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर, पांडुरंग यादव, वसुली विभाग प्रमुख राजाराम मोहिते तसेच सर्व सेवक, हितचिंतक, सभासद उपस्थित होते.

Related Articles