सातारा जिल्हाहोम

खटाव-माण साखर कारखान्याचा सहावा बॉयलर अग्नीप्रदिपण समारंभ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

खटाव-माण साखर कारखान्याचा सहावा बॉयलर अग्नीप्रदिपण समारंभ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दि. 12 रोजी कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोजदादा घोरपडे, कार्यकारी संचालक संग्रामबापू घोरपडे, संचालक विक्रमनाना घोरपडे, कृष्णत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल पाटील, प्रीती घार्गे-पाटील यांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना चेअरमन प्रभाकर घार्गे म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रात येत्या दोन वर्षात टेंभूचे पाणी येईल व उसाबाबत कारखाना स्वयंपूर्ण होईल. तसेच यावर्षी सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल व पुढील वर्षी अकरा लाख मॅट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

मनोजदादा म्हणाले, गेल्या वर्षी गाळपास आलेल्या उसास प्रति टन 151 रुपये दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील. तसेच दिवाळीनिमित्त प्रतिटन अर्धा किलो साखर वीस रुपये दराने शेतकऱ्यांना वितरित केली जाणार असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. उद्यापासून प्रत्येक गटावर साखर वाटप चालू केली जाणार आहे.

कार्यकारी संचालक संग्राम बापू यांनी मागील पाच वर्षात कारखान्याची कामगिरी अधोरेखित करून 2500 मॅट्रिक टन प्रतिदिन गाळपापासून सुरू झालेला कारखाना यावर्षी 6500 मॅट्रिक टन पर डे गाळप करणार आहे. त्यातील 1000 मेट्रिक टन उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. याचबरोबर 120 के. एल. पी. डी अवसानी प्रकल्प सुद्धा या ठिकाणी केला असून कारखाना स्वयंपूर्ण झाला आहे. भविष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना आम्ही पूर्ण क्षमतेने समोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक अण्णासाहेब निकम, ॲड. धनाजी जाधव, अमोल पवार, जयवंत जाधव, तोडणी वाहतूक चेअरमन जयवंत जाधव, युवराज साळुंखे, महेश चव्हाण आदी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते  विक्रमनाना घोरपडे यांनी आभार मानले.

Related Articles