सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये मराठा समाजबांधवांचा रास्ता रोको

कराड/प्रतिनिधी : –

मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले असून त्यांची तब्येत खालावत आहे. तरीही सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या मराठा समाजबांधवांनी कराड शहरातील दत्त चौकात रास्ता रोको आंदोलन करत लोकप्रतिनिधीं विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दत्त चौकातील रस्ता हा शहरातील वर्दळीचा रस्ता आहे. याच रस्त्यावर आंदोलकांनी सोमवारी सकाळी अर्धा तास रास्ता रोको केला. तसेच प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांनी दत्त चौकात येऊन निवेदन स्विकारण्याची मागणी केली. यानंतर वाहतूक कोंडी वाढत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना तहसील कार्यालयात जावून निवेदन देण्यास सांगितले. मात्र, आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिला. यामुळे भेदा चौक व कोल्हापूर नाका रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु, डॉक्टर व विद्यार्थांसाठी रस्ता खुला करून देण्यात आला.

त्यानंतर तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दत्त चौकात येऊन निवेदन स्विकारले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, भेदा चौक व कोल्हापूर नाका रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Related Articles