सातारा जिल्हाहोम

पाटणला 27 सप्टेंबर रोजी जन आक्रोश मोर्चा

कराड/प्रतिनिधी : – 

पाटण विधानसभा मतदारसंघात सध्या विकासकामांची जाहिरातबाजी सुरू आहे. यातील अनेक विकासकामे प्रस्तावित असून झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची आहेत. याबाबतचे पुरावेही आपल्याकडे असून सदर मोर्चाद्वारे हे पुरावे प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी दिली.

हर्षद कदम म्हणाले, सध्या, पाटण विधानसभा मतदारसंघातील ठिकठिकाणी विकासकामांचे फलक झळकत आहेत. परंतु, सदर फलकांवर उल्लेख असलेली अनेक कामे प्रस्तावित असून झालेली कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. फलकांवर असलेली विकासकामे केवळ फलकांवरच असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सदर निकृष्ट विकास कामांबाबतचे पुरावे आपल्याकडे असून हे पुरावे जन आक्रोश मोर्चाद्वारे प्रशासनास सादर करणार आहोत.

तसेच हे प्रशासन दोन वर्षांपासून सत्तेच्या दबावाखाली काम करत असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत व विकास कामांचे नकृष्ट दर्जाबाबत झोपेचे सोंग घेत आहे. याही गोष्टी निदर्शनास आणण्यासाठी आदरणीय शिवसेनाप्रमुख यांच्या शिकवणीप्रमाणे अन्याय सहन करणार नाही, या भावनेतून एक शिवसैनिक व तालुक्यातील सामान्य नागरिक म्हणून आपण या मोर्चात सहभागी होणार आहोत. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी या मोर्चात सहभागी होऊन आपल्या भागात झालेल्या निकृष्ट विकास कामांबाबतची माहिती द्यावी, असे आवाहनही श्री. कदम यांनी केले आहे.

Related Articles