दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार प्रामाणिकपणा केला परत
भंगार गोळा करणाऱ्या महिलेकडून माणुसकीचे दर्शन; संबंधितांकडून महिलेचा रोख रक्कम व साडी देवून सन्मान

कराड/प्रतिनिधी : –
येथील प्रितिसंगम घाटावर हरतालिका मुर्ती विसर्जन करताना तब्बल दहा टोळ्यांचा सोन्याचा राणीहार एका कुटुंबाकडून चुकून विसर्जित झाला होता. हा हार शहरातील शिवाजी स्टेडीयमजवळ राहणाऱ्या एका भंगार गोळा करणाऱ्या महिलेला सापडला. तिने तो हार प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांसह संबंधित कुटुंबीय व नागरिकांनी कौतुक केले. तसेच त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाबद्धल रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गोटे, ता. कराड गावचे रहीवाशी अधिकराव दिनकर पवार हे आपल्या कुटुंबासमवेत शनिवार, दि. 7 रोजी हरतालिका मुर्ती विसर्जन करण्यासाठी कराडच्या प्रितिसंगम घाटावर गील होते. हरतालिका मुर्ती विसर्जन करताना नजर चुकीने त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 30 हजार रुपये किंमतीचा अंदाजे दहा तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार विसर्जन झाला होता.
बुधवार, दि. 11 रोजी सदरचा राणीहार प्रितिसंगम घाटावर भंगार गोळा करणाऱ्या महीला नुरजहाँ फकीर रा. शिवाजी स्टेडीयमजवळ, कराड यांना मिळून आला. त्यानंतर नुरजहाँ फकीर यांनी सदरचा सोन्याचा राणीहार त्यांच्या ओळखीचे सोनार निसार सय्यद यांच्याकडे आणून दिला. सय्यद यांनी ही घटना माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना कळवली. निसार सय्यद व सिद्धार्थ थोरवडे यांनी त्या महिलेस तो हार तुम्हाला पाहिजे का? असे विचारले असता सदर महिलेने तो हार ज्यांचा असेल, त्यांना परत करण्यास सांगून माणुसकी दाखवत आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. त्यानंतर थोरवडे व सय्यद यांनी त्या महिलेसोबत सोन्याचा राणीहार घेऊन कराड शहर पोलीस ठाण्यात आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी शहानिशा करून अधिकराव दिनकर पवार यांना बोलावून घेत सदरचा सोन्याचा राणीहार ओळख पटवून त्यांच्या ताब्यात दिला आहे. तसेच नुरजहाँ फकीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस देत भंगार गोळा करणाऱ्या महिलांना साडी देवून त्यांचा यथोचित सत्कार केला. तसेच पोलिसांनी सुपर ज्वेलर्सचे मालक निसार सय्यद यांचाही प्रामाणिकपणाबद्दल सत्कार केला.
यावेळी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे गणेश कड, माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे, घनश्याम पेंढारकर, गंगाधर जाधव, शिवाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद चरेगावकर, समाधान चव्हाण, आदिमाया मंडळाचे किरण मुळे, पोलीस अधिकारी श्री तारू साहेब, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.