सातारा जिल्हाहोम

शहाजीराजे हे शिवरायांचे महागुरु – ‘पानिपत’कार विश्वास पाटील

कृष्णा कारखान्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानास प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

लाखोंच्या फौजेसमोर लढणारे शूरवीर योद्धे, भातवडीच्या युद्धात प्रथम गनिमी कावा वापरणारे शहाजीराजे होते. पण शहाजीराजेंचा इतिहास विस्ताराने कधी शिकविला गेलाच नाही. शहाजीराजे हे शिवरायांचे महागुरु होते, असे प्रतिपादन साहित्यिक, निवृत्त सनदी अधिकारी, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी केले.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘छ. शिवरायांचे धगधगते जीवन’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाटील म्हणाले, शिवरायांना 49 वर्षांचे आयुष्य लाभले. आणखी जरी दहा वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले असते, तरी छत्रपती शिवरायांनी भीमा – निराकाठची घोडीदेखील इंग्लंडच्या समुद्रकाठापर्यंत नेली असती. महाराजांनी निसर्गाचा चांगला अभ्यास केला होता. त्यांना नदी, डोंगर, वाटा-पायवाटा यांची चांगली माहिती होती. याचा त्यांनी स्वराज्य उभारणीत उपयोग केला. त्याचबरोबर शिवराय सामान्य माणसात असामान्य कर्तृत्व शोधून काढत होते. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर असे कर्तबगार सरदार त्यांनी शोधले. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा तरुण पिढीने डोळसपणे अभ्यास करावा. तसेच युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून धडे घेण्याची गरज आहे.

यावेळी व्ही. के. मोहिते, संजय पवार, कारखान्याचे जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक एम. के. कापूरकर, सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते, बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले.

Related Articles