सातारा जिल्हाहोम

सह्याद्रि कारखान्यावर बुधवारी जंगी कुस्त्यांचे खुले मैदान

कराड/प्रतिनिधी : –

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी. डी. पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील आखाड्यात बुधवार, दि. 11 रोजी दुपारी 2 वाजता जंगी कुस्त्यांचे खुले मैदान आयोजित करण्यात आले आहे.

आदरणीय पी. डी. पाटील यांनी सन 1981 पासून गणेशोत्सवात वजनगटानुसार वार्षिक मानधनावरील ऑलम्पिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धा व रोख पारितोषिकाच्या जंगी कुस्त्यांचे खुले मैदान भरवण्यास सुरुवात केली होती. तद्नंतर कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने मैदान भरविण्याची परंपरा सुरू ठेवत आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे मैदान भरविण्यात येते.

दरम्यान, रविवार दि. 8 आणि 9 रोजी वार्षिक मानधनावरील वजनगटानुसार ऑलम्पिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धेस सुरूवात झाली आहे. तसेच रोख पारितोषिकाच्या जंगी कुस्त्यांचे खुले मैदान बुधवार, दि. 11 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आले आहे. मैदानास पावसामुळे व्यत्यय येऊ नये, यासाठी कुस्ती आखाड्यास पत्र्याचा मंडप घालण्यात आला आहे. तसेच कुस्ती शौकीनांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

या मैदानामध्ये उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर विरूद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड, महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर विरूद्ध पै. माऊली कोकाटे, पै. किरण भगत विरूद्ध पै. आशिष हुड्डा, पै. रविराज चव्हाण विरूद्ध पै. बिन्ना, पै. दादा शेळके विरूद्ध मुन्ना झुर्जुके, पै. सुबोध पाटील विरूद्ध पै. वैभव माने, पै. प्रशांत शिंदे विरूद्ध पै. महारूद्र काळे यांसह महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांच्या असंख्य कुस्त्या होणार आहेत.

सदर कुस्ती स्पर्धा व रोख पारितोषिकाच्या जंगी कुस्त्यांच्या खुल्या मैदानासाठी होतकरू पैलवानांनी आणि कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles