विलासकाकांच्या रूपाने सहकारी चळवळीला एक दृष्टा नेता लाभला – शंभूराज देसाई
कोयना दूध संघाच्या आवारात विलासकाकांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

कराड/प्रतिनिधी : –
आधुनिक महाराष्ट्राच्या विकासामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे मोलाचे योगदान असून स्वर्गीय विलासकाकांच्या रूपाने सहकारी चळवळीत काम करणारा एक दृष्टा नेता सहकार चळवळीला लाभल्याने सहकार चळवळीचे बळकटीकरण झाले. याच स्वर्गीय लोकनेते विलासकाकांचा पूर्णाकृती पुतळा सहकार चळवळीत काम करणाऱ्यांना प्रेरणास्त्रोत ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
खोडशी, ता. कराड येथील कोयना सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावर समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भुरगडे-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी सभापती भीमराव पाटील, मनोज घोरपडे, उद्योजक राम निंबाळकर, श्याम निंबाळकर, अॅड. इंद्रजीत चव्हाण, अॅड. विजय पाटील, शिवनेरी शुगरचे संचालक अधिराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी जि. प. सदस्य प्रदीप पाटील, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, प्रा. धनाजी काटकर वसंतराव जगदाळे, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, संघाचे कार्यकारी संचालक अमोल गायकवाड यांसह जिल्ह्यातून आलेले विविध संस्थांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. देसाई म्हणाले, राज्यातील सहकारी चळवळीमध्ये सहकार क्षेत्रात काम करणारे अनेक दिग्गज नेते पश्चिम महाराष्ट्राने राज्याला दिले. आधुनिक महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकारी संस्थांची मोलाचे योगदान आहे. गाव पातळीवर काम करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी पासून ते राज्यातील सहकारी शिखर संस्थापर्यंत सहकारी संस्थांचे मोठे जाळे निर्माण झाले. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक उद्योग, प्रकल्पांची उभारणी झाली. यातून समाजाच्या आर्थिक उन्नतीबरोबर बेरोजगारांना रोजगार मिळाला. विलासकाका पाटील यांच्या रूपाने सहकारी चळवळीमध्ये दृष्टा नेता लाभला. सहकारी संस्थेमध्ये आर्थिक शिस्त व योग्य नियोजन कसे असावे, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विलासकाकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांची आजही आर्थिक उन्नती पाहता, ती दिसून येत आहे. नियोजनबद्ध व शिस्तप्रिय सहकार चळवळीतील दृष्टा नेत्याचा कोयना दूध संघाच्या प्रांगणात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा सहकारी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणास्रोत ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्वर्गीय विलासकाकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात काम केले .आपल्या योग्य, शिस्तबद्ध व नियोजनबद्धतेमुळे सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक विकास घडवून आणण्यात त्यांना यश आले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेची कास धरत त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करत अत्यंत सर्वसामान्यांतील सामान्य माणसाला राजकीय सत्तास्थाने देऊन कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्यात त्यांना यश आले. सहकारी चळवळीचा पाया मजबूत करण्यावर त्यांचा नेहमीच भर होता. त्यांचे सहकार क्षेत्रातील मोलाचे योगदान असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सहकारी संस्थांना आर्थिक उर्जितावस्थामध्ये आणण्यात त्यांना यश आले. त्यांच्याच विचाराचा वसा आणि वारसा जोपासत कराड तालुक्याचे नेते
अॅड. उदयसिंह पाटील हे कार्यरत असून तालुक्यातील सहकारी शिखर संस्थेच्या मार्गदर्शन भूमिका बजावत सहकारी संस्थांची आर्थिक उन्नती साधली आहे.
पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, विलासकाका नास्तिक व मी आस्तिक असा आमच्यामध्ये विरोधाभास फरक होता. परंतु, विलासकाका हे विज्ञानवादी लढवय्या, कर्मठ कार्यकर्ता, कार्यसम्राट म्हणून त्यांचा समाजावर आगळा-वेगळा ठसा होता. त्यांच्या मतदारसंघांमध्ये अनेक वेळा विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांना जाण्याचा योग आला. त्यांची समाजातील शेवटच्या घटकाविषयी असणारी तळमळ पाहता, समाजासाठी काहीतरी करण्याची तगमग पाहता असा दृष्टा नेता या तालुक्याला लाभला, हे मोठे भाग्य आहे. समाजासाठी सतत उन्नतीचा विचार करणारा नेता म्हणून त्यांची एक आवळी-वेगळी ख्याती होती. तत्त्वाशी बांधील असणाऱ्या विलासकाकांनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. अनेक आमिषांना बळी न पडता तत्त्वाशी कायम एकसंघ राहणारा दृष्टा नेता म्हणून विलासकाकांकडे बघितले जात होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा चालवणारे अॅड. उदयसिंह पाटील हे काकांना अभिप्रेत समाजप्रीत्यर्थ कार्य त्यांच्या हातून घडो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक व स्वागत करताना अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, कोयना सहकारी दूध संघाच्या प्रगतीत विलासकाकांचे योगदान मोठे असून संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम केले. आज कोयना दूध संघ एक लाख लिटर दूध संकलन करून विविध उपपदार्थांच्या माध्यमातून संघ प्रगतीपथावर आहे. तसेच भविष्यात या संघाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी, कोयना सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, रयत संघटनेतील कार्यकर्ते तरुण, महिला व कोयना दूध संघाचे सर्व संचालक, सेवक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.