ग्रामीण खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचावे – अशोकराव थोरात
मलकापूरात शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षीसाबरोबरच खेळासाठी येणारा खर्चही तितकाच महत्त्वाचा असून शासन स्तरावर त्याचा विचार व्हावा, असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.
स्कायलाइन रायफल व पिस्टल शूटिंग अकॅडमी मलकापूर व श्री मळाईदेवी शिक्षण संचलित आ. च. विद्यालय पोतले, ता. कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे उद्घाटन अशोकराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप, रवी पाटील, महेंद्र भोसले, आनंदराव जानुगडे, उदय काळे, पवन पाटील, सारंग थोरात उपस्थित होते.
संगीता जगताप म्हणाल्या, खेळाडूंनी अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष देऊन खेळात प्राविण्य मिळवून आपले व देशाचे नाव उज्वल करावे. सदर शालेय नेमबाजी स्पर्धा मुले-मुली 14,17,18 या वयोगटात भरवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे संयोजक स्काय लाईन रायफल अँड पिस्टल शूटिंग अकॅडमी मलकापूरचे संचालक सारंग थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक महिंद्र भोसले, सूत्रसंचालन सोपान जगताप, जयवंत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रशिक्षक रितूल कुंडले, वैशाली थोरात, विकास रणसिंग, अल्ताफ शिकलगार, विविध ठिकाणाहून आलेले खेळाडू व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.