सातारा जिल्हाहोम

पतंगराव कदम यांच्या पुतळा व स्मारकाचा आज अनावरण सोहळा

कराड तालुक्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, माजी मंत्री, आ. डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा, तसेच ‘लोकतीर्थ’ स्मारक कडेगाव जि. सांगली येथील सोनहिरा साखर कारखाना उभारण्यात आले आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आज गुरुवार, दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी कराड तालुक्यातील कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी, कराड शहर काँग्रेस कमिटी व कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे सुमारे दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, स्वा. आ. डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा, तसेच ‘लोकतीर्थ’ स्मारक लोकार्पण सोहळ्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेनिथला, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य के. सी. वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

डॉ. पतंगराव कदम यांची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविषयी प्रचंड आपुलकी व प्रेम होते. त्यांनी राज्यात व मतदारसंघातील घराघरात काँग्रेसचा विचार रुजविला. तसेच भारती विद्यापीठ व इतर संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांची नाळ जोडली गेली आहे. अशा थोर व्यक्तीचे ‘लोकतीर्थ’ स्मारक उभारण्यात आले आहे. डॉ. पतंगराव कदम यांचे हे स्मारक उभारण्यासाठी त्यांचे पुत्र आ. डॉ. विश्वजित कदम, त्यांचा परिवार, तसेच कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. सदर लोकार्पण सोहळ्यास डॉ. पतंगराव कदम यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्ते व लोकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील, युवक काँग्रेस कमिटीचे शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे व कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी केले आहे.

Related Articles