…तर; रविवारी रेल रोको आंदोलन करणार – सचिन नलवडे
रयत क्रांती संघटनेसह पार्ले व विरवडे ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी आक्रमक

कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यातील पार्ले व विरवडे हद्दीतील आवडगिरी देवस्थानला जाणारा रेल्वे लगतचा रस्ता, तसेच हद्दीतील ओढ्यावर सिमेंट पाइप टाकून पूर्वीप्रमाणे रस्ता करून द्यावा. अन्यथा येत्या रविवारी रयत क्रांति संघटना पार्ले व विरवडे येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
ओगलेवाडी येथील रेल्वे पोलीस कार्यालयात प्रबंधकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी नेते सचिन नलवडे, विरवडेचे राजन धोकटे, प्रसाद धोकटे, मनोज डांगे, राजाराम शिंदे, विशाल शिंदे, दीपक जाधव व शेतकरी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सदर मागणीसाठी रयत क्रांती संघटना आणि पार्ले व विरवडे येथील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले होते. निवेदन देवून पंधरा दिवस होऊनही रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी ओगलेवाडी येथील रेल्वे पोलीस कार्यालयात प्रबंधकाना निवेदन देवून येत्या चार दिवसांत रस्त्याचे काम न झाल्यास रविवार, दि. 8 रोजी सकाळी 10 वाजता रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थ, शेतकरी आवडगिरी मठ (विरवडे) येथे रेल रोको करणार असल्याचा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.