कोयना दूध संघावर शुक्रवारी लोकनेते विलासकाका पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार अनावरण

कराड/प्रतिनिधी : –
लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या आचार व विचारांची भावी पिढीला स्फूर्ती व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कोयना दूध संघाने संघाच्या प्रांगणात विलासकाकांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण शुक्रवार, दि. 6 रोजी दुपारी 3 वाजता श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते व पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कोयना सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई यांनी दिली.
येथील कोयना बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दूध संघाचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे व कोयना दूध संघाचे संचालक उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रीया संघाची स्थापना सन 1957 साली सहकारमहर्षी आर. डी. पाटील यांनी केली. सन 1985 सालापासून राज्याचे माजी सहकार मंत्री लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाने कोयना उपपदार्थांची निर्मिती करून आपला नावलौकीक करून ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. कोयना दूध संघाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या विलासकाकांचा पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी दुपारी कोयना दूध संघाच्या प्रांगणामध्ये होत आहे. या समारंभ पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, खा. नितीन जाधव-पाटील, कोयना दूध संघाचे मार्गदर्शक व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील –उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या समारंभास काकाप्रेमी, काँग्रेस व रयत संघटनेतील कार्यकर्ते, संघाचे दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव व कार्यकारी संचालक अमोल गायकवाड यांनी केले आहे.