जिल्हा बँकेची नोकरभरती पारदर्शीपणे करावी – जयवंतराव शेलार
टाटा कन्सलटंशी सर्व्हिसेस व इंस्टिटयूट ऑफ बँकींग अँड पर्सनल सिलेक्शन कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करण्याची मागणी

कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा या बँकेमधील लेखनिक व शिपाई पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. सदर नोकर भरती पारदर्शीप्रमाणे होण्यासाठी सातारा जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया ही राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेच्या धर्तीवर करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेतर्फे केली असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हा बँकेने दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीनुसार कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. जिल्हा बँकेमध्ये होणारी ही नोकर भरती पारदर्शीपणे होणे गरजेचे आहे. दरम्यान, राज्य शासनाने शासकीय नोकर भरतीसाठी टाटा कन्सलटंशी सर्व्हिसेस व इंस्टिटयूट ऑफ बँकींग अँड पर्सनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) या दोन कंपन्याकडून नोकर भरतीसाठी आवश्यक असलेली परिक्षा घेऊन पारदर्शिपणे पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाते. याच निकषानुसार वर नमूद केलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचीही नोकर भरती पारदर्शकपणे होणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेना पक्षाच्यावतीने आपण मागणी केली असल्याची माहिती श्री. शेलार यांनी सदर पत्रकाद्वारे दिली आहे.