आरोग्य विभागाकडून उपोषणकर्त्यांची चेष्टा
बदली झालेल्या अधिकार्याला पाठवले चर्चेला; मनोज माळी यांचे दुसर्या दिवशी उपोषण सुरूच

कराड/प्रतिनिधी : –
येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर दोन दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आरोग्य विभागाने चक्क पुणे येथे बदली झालेले अधिकारी व ज्यांच्यावर उपोषणकर्त्यांनी आरोप केले आहेत, असे अधिकारी पाठवून आमची चेष्टा केल्याचा आरोप मनोज माळी यांनी केला आहे. मात्र, आरोग्य विभाग गांभीर्याने घेत नसेल, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा माळी यांनी दिला आहे.
कराडला मंजूर झालेली कॅथ लॅब कराडलाच व्हावी, या मुख्य मागणीसह जिल्ह्यातील बोगस सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीबाबत कारवाई करावी, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षारक्षकांच्या नियुक्ती जिल्हा मंडळाकडून करण्यात याव्यात, खाजगी रुग्णालय चालवणारे डॉ. राजेश शेडगे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केल्याबाबत व अन्य मागण्यांसाठी मंगळवारपासून प्रहारचे उपजिल्हा रुग्णालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे.
बुधवारी उपोषणाच्या दुसर्या दिवशी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक विकास वडगये व कुलकर्णी मॅडम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. मात्र, वडगये यांची पुणे येथे बदली झाली आहे. तर कुलकर्णी यांच्यावर डॉ. शेडगे यांच्या विरोधात चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप आम्ही केला आहे. अशा दोन अधिकार्यांना चर्चेसाठी पाठवून जिल्हा शल्य चिकित्सकांनी आमची चेष्टा केली आहे. चर्चेसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी यावे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे माळी यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी प्रीतम यादव, आनंदराव लादे, निशांत ढेकळे, रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे, शिवसेनेचे शहरप्रमुख शशिराज करपे, मराठा क्रांती मोर्चाचे दत्ता पाटील, योगेश झांब्रे, विवेक भोसले, संतोष थोरावडे, चंद्रकांत यादव, जगदीश पाटील, किरण भोसेकर, आकाश रेटरेकर, प्रवीण शिंदे, राहुल चव्हाण, समीर कुडची, दिनेश मोहिते, जयप्रकाश हूलवान, पै. अक्षय चव्हाण, अक्षय तुपे, ऋषी पिसाळ, सागर पिसाळ, तालुक्यातील अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.