सातारा जिल्हाहोम

कोयना दूध संघाची वार्षिक उलाढाल 135 कोटींवर – लक्ष्मणराव देसाई

संघ म्हैशीला 50 व गायला 40 पैसे दर फरक देणार 

हेळगाव/वार्ताहर : –

माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. दिवसेंदिवस दुग्ध व्यवसायात स्पर्धा वाढत असताना सहकारी दुग्ध व्यवसाय टिकून राहावा, त्यातून सर्वसामान्यांचे हित जोपासले जावे, या उद्देशाने काम करत असलेल्या कोयना दूध संघाने दूध उत्पादकांना यावर्षी म्हैस दुधासाठी 50 पैसे, तर गाय दुधासाठी 40 पैसे प्रमाणे सुमारे 35 लाख रुपये दर फरक देण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई यांनी केले.

खोडशी, ता. कराड येथे कोयना दूध संघाच्या 67 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी रयत कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, खरेदी विक्रीचे अध्यक्ष अनिल मोहिते, माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण, प्राध्यापक धनाजी काटकर, कोयना बँकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर, बाजार समितीचे उपसभापती संभाजी चव्हाण, निवासराव निकम, अधिकराव जगताप, रामचंद्र बल्लाळ, शिवशंभो संघाचे उपाध्यक्ष संजय शिर्के, संचालक सर्जेराव शिर्के, अरविंद शिबे सीए तानाजीराव जाधव, श्रीमंत काटकर, राजेंद्र पाटील, टी. के. पाटील, उत्तमराव जगताप, संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव सर्वसंचालक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चेअरमन देसाई म्हणाले, दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देण्याबरोबरच विविध सोयी-सुविधा देण्यासाठी संघाने आघाडी घेतली आहे. संघाचे मार्गदर्शक अॅड. उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना बँकेच्या सहकार्यातून कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना हरियाणा जातीच्या चांगल्या प्रजातीच्या म्हैशींचे वाटप करून दूध उत्पादन वाढीसाठी संघ यापुढे प्रयत्नशील राहणार आहे. संघाचे सरासरी दूध संकलन साठ हजार लिटर असून ते एक लाखापर्यंत वाढवण्यासाठी विविध योजना राबवून दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेचे नोटीस वाचन संघाचे कार्यकारी संचालक अमोल गायकवाड यांनी केले. विषय पत्रिकेतील सर्व विषय बहुमताने खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले.सूत्रसंचालन सयाजीराव मोहिते, संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी आभार मानले.

यावेळी कोयना दूध संघ, खरेदी विक्री संघ, बाजार समिती, कोयना बँक आदींचे आजी-माजी संचालक, तसेच प्राथमिक सहकारी दूध संस्थांचे प्रतिनिधी, चेअरमन, सचिव, दूध उत्पादक, कर्मचारी उपस्थित होते.

या संस्थांचा केला सन्मान

प्राथमिक दूध संस्थांचा सन्मान यावेळी संघाच्या वतीने करण्यात आला. सर्वोच्च दूध पुरवठा करणाऱ्या कोपर्डे डेअरी – कोपर्डे हवेली, भैरवनाथ दूध संस्था – येवती, सिद्धेश्वर दूध संस्था – वडगाव, बहिरोबा दूध संस्था – आरेवाडी, ज्योतिर्लिंग दूध संस्था – शेळकेवाडी, सर्वोच्च दूध पुरवठा महिला संस्थांमध्ये एकता महिला – घोणशी, लक्ष्मीदेवी महिला – मेंढोशी, ज्योतिर्लिंग महिला – मसूर, सर्वोत्कृष्ट गुण प्रत म्हैस दूध भैरोबा दूध संस्था – आरेवाडी, गाय दूध कोपर्डे डेअरी दूध संस्था – कोपर्डे हवेली या संस्थांचा प्रशस्तीपत्र, बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Related Articles