भ्रष्टाचारी भाजप सरकारला जनता कदापीही सोडणार नाही – पृथ्वीराज चव्हाण
मालवण घटनेचा कॉंग्रेसतर्फे कराडमध्ये निषेध; राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

कराड/प्रतिनिधी : –
नौदलाचा सल्ला झुकारून नौसेना दिनादिवशी शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई पंतप्रधानांनी केली. या पुतळ्याच्या मूळ टेंडरमध्ये बदल करून भरीव पुतळ्याऐवजी पत्र्याचा पुतळा उभारण्यात आला. भ्रष्ट्राचारी भरज सरकारने शिवरायांच्या पुतळा उभारणीतही केलेला भ्रष्ट्राचार अत्यंत खेदजनक असून अशा भ्रष्टाचारी भाजप सरकारला जनता कदापीही सोडणार नाही, अशी टिका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेचा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तसेच महाराष्ट्र सरकारमधील बांधकाम मंत्री आणि एक जबाबदारी मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची जबाबदारी घ्यायला हवी. शिवरायांच्या संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला जनता कधीही सोडणार नाही, असे बजावत शिवरायांची अस्मिता जपायची असेल, तर कोणीतरी प्रायश्चित्त केले पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आ. चव्हाण पुढे म्हणाले, या घटनेचा सबंध राज्यभर आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार आहे. काही सहकारी मालवण येथे आंदोलन करण्यासाठी गेले आहेत. काही दिवसांत आणखी व्यापक आंदोलन करण्यात येणार आहे. आता तातडीने राज्यभर अशाप्रकारे निषेध नोंदवून आंदोलन करण्यात येत आहे. शिवरायांची माफी मागून या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आपण कोणते सरकार निवडून दिले, याचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू आहे, तोपर्यंत राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यायला हवा. ज्याप्रमाणे बदलापूरची घटना दडपण्याचा प्रयत्न झाला. तसेच अन्य काही घटनांच्या बाबतीतही तसा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला, जनता त्याला माफ करणार नाही, असा इशाराही आ. चव्हाण यांनी यावेळी दिला.
यावेळी महाराष्ट्र युवक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोगर शिंदे, कराड दक्षिण कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, झाकीर पठाण यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच महिलांची उपस्थित होती.