मोडी लिपीच्या माध्यमातून दुर्लक्षित इतिहास उलगडण्यास मदत – मानसिंगराव कुमठेकर
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ

कराड/प्रतिनिधी : –
देशाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभ्यास करण्यासाठी मोडी लिपीसारख्या मुळ दस्तऐवजांचा संशोधन अभ्यास केल्यास दुर्लक्षित इतिहास उलगडण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन मिरज येथील इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी केले.
येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात इतिहास विभाग व मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्यातील सामंजस्य करारांतर्गात आयोजित ऑगस्ट क्रांती दिन, मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग उद्घाटन समारंभ व प्रमाणपत्र वितरण अस्य संयुक्तिक कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. यावेळी प्रा. ए. जी. थोरात, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. जोतीराम आंबवडे, प्रा. युवराज कापसे व प्राध्यापक उपस्थित होते.
श्री. कुमठेकर म्हणाले, मोडी लिपी हा अमूल्य ठेवा आहे. या लिपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच मुळचा इतिहास व संस्कृती जगासमोर आणता येईल. तसेच मोडी लिपीच्या संशोधनातून गतकाळातील इतिहास, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी मदत होईल.
प्रा. थोरात म्हणाले, अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. सातारा परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ नाईकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, डॉ. बापूजी साळुंखे याही क्रांतीकारकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्वपूर्ण आहे.
प्राचार्य डॉ. घाटगे म्हणाले, प्रचारकी इतिहास अभ्यासल्यापेक्षा मुळ दस्तऐवजांचे संशोधन करुन खरा इतिहास जगासमोर आणणे गरजेचे आहे. तसेच खरा इतिहास कितीही लपविण्याचा प्रयत्न केला, तरी त्यातील सत्य कधी ना कधी जगासमोर येत असते.
याप्रसंगी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी अनेक प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. तसेच इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रांतीयुगातील एक सुवर्ण पान’ या भीत्तीपत्रिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. सचिन बोलाईकर, सूत्रसंचालन प्रा. जोतीराम आंबवडे, प्रा. युवराज कापसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.