तासवडेच्या सरपंचपदी दिपाली जाधव यांची बिनविरोध निवड

कराड/प्रतिनिधी : –
तालुक्यातील महत्वपूर्ण अशा तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. दिपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. सन 2021 च्या पंचवार्षिक निवडणुकीत तासवडे ग्रामपंचायतीत सत्तांतर घडून सह्याद्री ग्रामविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती.
या निवडणुकीत नऊ पैकी सात जागा आघाडीच्या निवडून आल्या होत्या. या आघाडीचे नेतृत्व अमित जाधव, राजेंद्र जाधव व विकास जाधव यांनी केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी जयराम बोडके यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक समाधान माने, उपसरपंच भीमराव खरात, सदस्य सुभाष जाधव, निवास जाधव, बजरंग गुरव, लता जाधव, भारती शिंदे, अश्विनी जाधव, मनीषा जाधव उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत तासवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात दुसरे आणि स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुक्यात पहिले असे दोन्ही मिळून 13 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याचसोबत गावातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून सध्या 80 टक्के रस्ते सिमेंटचे झाले आहेत. भविष्यात इतर रस्ते जिल्हा नियोजन आणि स्थानिक विकास निधीतून करण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. जलजीवन मिशनसाठी 70 लाख रुपये, रस्त्यांसाठी व गटर्ससाठी एकूण 52 लाख, सौर पंपासाठी 10 लाख, थंड पाण्याचे वॉटर एटीएम, ग्रामपंचायतीचे पहिला मजला विस्तारीकरण, सौर पथ दिवे, पंधरावा वित्त आयोग, जनसुविधा, समाजकल्याण विभाग आदी योजनेतून विक्रमी अशी सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांची कामे मंजूर होऊन काही कामे पूर्ण झाली आहेत. आगामी कालावधीत स्मशानभूमी सुशोभीकरण, व्यायामशाळा, अभ्यासिका व संपूर्ण पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.
सौ. दिपाली जाधव यांच्या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, मा. खा. श्रीनिवास पाटील, युवा नेते उदयसिंह पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड द. काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उ. काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांच्यासह युवराज जाधव, अरविंद जाधव, दामोदर खरात, मोहन खरात, सुधीर खरात आदींसह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.