विंग येथे शुक्रवारी भाजपचा जनसंवाद मेळावा
भारतीय जनता पार्टी, कराड दक्षिणतर्फे आयोजन; केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

कराड/प्रतिनिधी : –
भारतीय जनता पार्टी, कराड दक्षिणच्या वतीने शुक्रवार, दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता विंग, ता. कराड येथील आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणावर भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, तथा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कराड दक्षिणचे तालुकाप्रमुख पै. धनंजय पाटील यांनी दिली.
या जनसंवाद मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, तसेच कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या जनसंवाद मेळाव्यास खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, कराड दक्षिणचे ज्येष्ठ नेते, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सचिव भारत पाटील, जिल्हाध्यक्ष धैरशील कदम, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तरी या भव्य जनसंवाद मेळाव्यास तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही कराड दक्षिणचे तालुकाप्रमुख पै. पाटील यांनी केले आहे.