व्यक्तिमत्व फुलवायला वक्तृत्व व कर्तत्वाचा व्यासंग लागतो – डॉ. निलेश मालेकर
सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –
मानवी जीवन अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्या समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती वेगवेगळे मार्ग स्वीकारते. त्यामधील सर्वात साधा, सोपा व टिकणारा मार्ग म्हणजे वक्तृत्व आणि कर्तृत्व आहे. एकविसाव्या शतकात वाचनाचा वेग प्रचंड कमी झाला आहे. वाङ्मय हा प्रकार व्यक्तिमत्वाला समृद्ध करतो. वाचनाने मानवी मन, तर श्रमाने शरीर समृद्ध होते. या जगात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर कष्टाला पर्याय नाही. साहित्याचा आस्वाद घेतला, तर व्यक्तिमत्व फुलते. अनेक विचारांमधून वक्ता घडत असतो. जर आपण वाचन संस्कृती जोपासली, तरच व्यक्तिमत्व संपन्न होईल. व्यक्तिमत्व फुलवायला वक्तृत्व आणि कर्तृत्वाचा व्यासंग लागतो, असे मत प्रा. डॉ. निलेश मालेकर यांनी व्यक्त केले.
येथील सगाम कॉलेज वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. नेताजी सूर्यवंशी होते. यावेळी प्रा. डॉ. रमेश पोळ, प्रा. डॉ. रामचंद्र व्हनबटे, प्रा. डॉ. दिलीप कुमार कसबे, प्रा. डॉ. विजयकुमार जवान, प्रा. गौतम बनसोडे, प्रा. डॉ. महिपती शिवदास, प्रा. डॉ. ए. के. पाटील, प्रा. भिमराव गायकवाड, प्रा. विद्या पाटील, प्रा. अजीत लिपारे, प्रा. डॉ. सुचेता औंधकर, प्रा. डॉ. प्राजक्ता निकम, प्रा. अनंत निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मालेकर म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. चांगले वाचन, चांगली झोप आणि चांगली भूक ही प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची लक्षणे आहेत. वाचनाचा फायदा लगेच होणार नाही. पण सततच्या वाचनामध्ये तुमची सहनशीलता, क्षमता, दुसऱ्याला समजावून घेण्याची ताकद वाढते. ते म्हणाले, प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने ऐका, त्यांचा व्यासंग पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की, प्रचंड वाचन ही मेंदूची क्षमता कशी वाढवितो. वाचनाने आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे जीवनातील तणाव मुक्त होऊन ते जीवन आनंदी व सुखमय करता येते.
प्रा. नेताजी सूर्यवंशी म्हणाले, अलीकडे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आपल्याला चांगले जगायचे असेल, तर वाचन केलेच पाहिजे. विपुल साहित्य वाचले पाहिजे तुमच्या वाणीवर सरस्वतीचा झंकार असलाच पाहिजे. उत्तम वक्ता हा माणसांच्या विचारांमधून घडत असतो, ही विचारांची देणगी साहित्यामधून आपल्याला मिळत असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत वाङ्मय मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. बाबासाहेब नाईक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. कोमल कुंदप यांनी, तर प्रा. डॉ. रामचंद्र व्हनबटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.