सातारा जिल्हाहोम

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सर्व पात्र महिलांना लाभ द्या – मुक्ताबाई माळी

पाटण तालुका समितीच्या अध्यक्षा माळी यांच्या प्रशासनास सूचना 

कराड/प्रतिनिधी : –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील गोर-गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरु केली आहे. राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजनेच्या नव्याने गठीत करण्यात आलेल्या पाटण तालुका समितीच्या अध्यक्षपदी पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती मुक्ताबाई बबनराव माळी यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी तहसीलदार अनंत गुरव, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, समाज कल्याण विभागाचे सहा. आयुक्त, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह समिती  सदस्य उपस्थित होते.

या निवडीनंतर मुक्ताबाई माळी तात्काळ तालुका समितीची बैठक घेतली. या बैठकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ देऊन ही योजना यशस्वी करूया, असे प्रतिपादन समितीच्या अध्यक्षा श्रीमती माळी यांनी केले.

श्रीमती माळी म्हणाल्या, सदर योजनेचे अर्ज भरण्याचे काम सध्या तालुक्यामध्ये प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. महिलांनी देखील आपला अर्ज भरत असताना सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अचूक माहिती द्यावी, डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये इंटरनेट सुविधा कमी-अधिक प्रमाणात असल्याने या योजनेचे अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात अर्ज भरुन घेण्याची खबरदारी प्रशासनाने घेऊन गावातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सरकारकडून रक्षाबंधन दिवशी महिलांना खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करत महिला भगिनींना अनोखी भेट देण्यात येणार असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या योजनेसाठी सर्वेक्षण करत संपूर्ण मतदारसंघात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करावी.

Related Articles