कराडला लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद
25 कोटींच्या तडजोडी; तीन हजार प्रकरणे निकाली

कराड/प्रतिनिधी –
येथील न्यायालयात भरवण्यात आलेल्या लोक अदालतीत तब्बल 25 कोटी रुपयांच्या तडजोडी करण्यात आल्या. तर दाखल आणि दाखल पूर्व अशी तब्बल 2927 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कराड तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्या नेतृत्वाखाली कराड न्यायालयात झालेल्या लोक अदालतीस कराडसह पाटण तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात लोकांमधील वाद सामोपचाराने मिटावे, यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येते. त्यानुसार कराड न्यायालयात एकूण प्रलंबित 18150 प्रकरणांपैकी 4455 प्रकरणे लोक अदालतीसत ठेवण्यात आली. यापैकी 1449 प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. तर वेगवेगळे दावे, चेक बाउन्स प्रकरणे, अपघात प्राधिकरण यासह आर्थिक वाद यांचे जवळपास 24 कोटी 23 लाख 61 हजार 497 रुपयांच्या तडजोडीही करण्यात आल्या. तसेच दाखल पूर्व प्रकरणापैकी 4768 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली. यापैकी 1478 प्रकरणे निकाली निघाली.
यामध्ये तब्बल एक कोटी 27 लाख 55 हजार 327 रुपयांच्या तडजोडी करण्यात आल्या. त्यामुळे एकूण 18,150 प्रकरणांपैकी 9223 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली. यापैकी तब्बल 2927 प्रकरणे निकाली निघाली असून 25 कोटी 51 लाख 16 हजार 824 रुपयांच्या तडजोडी करण्यात आल्या. तसेच अनेक वैवाहिक वाद व तत्सम प्रकारची प्रकरणेही निकाली निघाली.
जिल्हा न्यायाधीश यू. एल. जोशी म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराडमध्ये भरवण्यात आलेल्या लोक अदालतीस सकाळपासूनच पाऊस असतानाही जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला. कराडकरांनी सामोपचाराने अनेक वाद मिटवल्याने दोन्ही बाजूच्या पक्षकारांना समसमान न्याय मिळाला. या भागातील जनता सुज्ञ असून त्यांनी लोक अदालतीस दिलेल्या प्रतिसादा बद्दल त्यांची आभारी आहे. हे लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी सहकार्य व योगदान दिल्याने लोक अदालत यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
या लोक अदालतीत जिल्हा न्यायाधीश यु. एल. जोशी, डी. बी. पतंगे, वरिष्ठ न्यायाधीश एस. डी. कुरेकर, श्री. घुले, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. झेड. सय्यद, पी. एस. भोसले, प्राजक्ता शेलार आणि सौ. मोहिते यांनी सहभाग नोंदवला.