कराडमध्ये शौर्य दिन उत्साहात साजरा
विजय स्तंभावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून शहिद जवानांना मानवंदना

कराड/प्रतिनिधी –
येथील विजय दिवस चौकात विजय दिवस समारोह समितीच्या वतीने ‘कारगिल विजय दिवस’ (शौर्य दिन) साजरा करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते विजय स्तंभावर पुष्पचक्र वाहून शहिद जवानांना मानवंदना देण्यात आली.
लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरावर पाकिस्तानी सेनेने घुसखोरी करून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी ताब्यात घेतली होती. कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच जागी असलेल्या या ठाण्यांवर घुसखोरी करणाऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी 60 दिवस चाललेल्या युद्धात 527 भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारताला विजय प्राप्त करून दिला होता.
भारतीय जवानांच्या या शौर्याचे व विजयाचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै ‘कारगिल विजय दिवस’ दरवर्षी विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराडमधील विजय स्तंभावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अॅड. संभाजीराव मोहिते, एकनाथ बागडी, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, विनायक विभुते, विलासराव जाधव, प्रा. भगवान खोत, रत्नाकर शानभाग, रमेश पवार, राजीव अपिणे, संतोष पवार, छत्रपती शिवाजी उद्यानचे सर्व सदस्य, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.