सातारा जिल्हाहोम

कराड अर्बन बँकेला एकूण 37.11 कोटींचा ढोबळ नफा 

डॉ. सुभाष एरम; बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर 

कराड अर्बन बँकेला एकूण 37.11 कोटींचा ढोबळ नफा

डॉ. सुभाष एरम; बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

कराड, दि. 28 (प्रतिनिधी) – कराड अर्बन बँकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण व्यवसायाचा पाच हजार कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार करत एकूण व्यवसाय पाच हजार 186 कोटींवर पोहोचविला आहे. यामध्ये 3261 कोटींच्या ठेवी, तर 1924 कोटींचा कर्ज व्यवसाय आहे. बँकेला एकूण 37.11 कोटींचा ढोबळ व आयकर व तरतुदी वजा 24.12 कोटींचा निव्वळ नफा झाला असून बँकेने आपली सक्षमता व सुदृढता कायम राखली असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी व्यक्त केले.

कराड अर्बन बँकेची 107 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. 28 जुलै रोजी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, सर्व संचालक, तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व सदस्यांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. जोशी म्हणाले, बँकेने मागील वर्षीप्रमाणे वसुलीच्या कामकाजात कृती आराखड्याची अंमलबजावणी करत जुन्या आणि नवीन एन.पी.ए. खात्यांतून लक्षणीय वसूली करत नक्त एन.पी.ए.चे प्रमाण 0.44 टक्के राखले असून सभासदांना दहा टक्के लाभांश देत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच ग्राहकसेवेत वाढ करून रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी मिळवली आहे. येत्या काळात कराड अर्बन बँक सहकार क्षेत्रामध्ये अधिक सक्षम आणि सदृढ असेल, असा विश्वासही अध्यक्ष डॉ. एरम यांनी यावेळी व्यक्त केला.

बँकेने चालू वर्षांत भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) 16.16 टक्के राखून आपली सक्षमता आणि सुदृढता आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे. एकूण 62 शाखांपैकी 24 शाखांचा एन.पी.ए. शून्य टक्के असून निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण 0.44 टक्के आहे. बँकेच्या 62 शाखांपैकी एकूण 49 शाखांनी नफा मिळवला असून 26 शाखांना एक कोटींपेक्षा अधिक नफा झाला आहे. नव्याने सुरू केलेल्या दहा शाखांनी तीन-चार महिन्यांमध्ये सुमारे 100 कोटींचा व्यवसाय करून ग्राहकसंख्येत लक्षणीय वाढ केली आहे. यातून बँकेवर समाजाचा असणारा अढळ विश्वास अधोरेखित होतो.

मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी नोटीस वाचन केले. मोबाईल बँकिंग सेवा देण्यासाठी बँक सज्ज असून सप्टेंबर अखेर ग्राहकांना या सुविधेचा परिपूर्ण वापर करता येईल असे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले. सभेपुढे संचालकांनी सादर केलेल्या सर्व विषयांना सभासदांनी मान्यता देवून सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेकडून पाच नवीन शाखांनाप रवानगी

बँकेला रिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, सांगोला, तसेच सातारा जिल्ह्यातील वाई अशा चार शाखा आणि सातारा येथील विस्तारीत कक्षाचे शाखेत रूपांतर अशा एकूण पाच नवीन शाखांना परवानगी दिली आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये या शाखा कार्यन्वित होणार असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.

Related Articles