सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये अज्ञातांकडून ठेकेदार कंपनीच्या क्रेनवर दगडफेक

संतप्त नागरिकांकडून कृत्य; शहरात काहीकाळ तणाव, पोलिसांकडून कार्यवाही सुरू 

कराड/प्रतिनिधी : –

शहरात पुणे-बंगलोर महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान ठेकेदार कंपनीच्या चुकीच्या कामामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेल्याने शहरात चार-पाच दिवस पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जुन्या जॅकवेलची दुरुस्ती करून शहराला तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मंगळवारी रात्री सदर कंपनीची क्रेन सदर जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरवर उभे केल्याने शॉर्टसर्किट होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या अज्ञात नागरिकांनी बुधवारी क्रेनवर दगडफेक केली.

ठेकेदार कंपनीने कोयना नदीवर नवा पुल उभारताना नदीपत्रात भराव टाकून पाणीप्रवाह रोखला होता. त्यामुळे तीव्र पाणीप्रवाह निर्माण होऊन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन वाहून गेली होती. त्यामुळे नागरिकांना चार-पाच दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी, तसेच नगरपालिका प्रशासनाने टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला. तसेच जुन्या जॅकवेच्या पंपाची दुरुस्ती करून तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

मात्र, मंगळवारी रात्री ठेकेदार कंपनीची क्रेन जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरवर उभी केल्याने शॉर्टसर्किट झाले. परिणामी,  मोटरचा विद्युत पुरवठा खंडित झाला. यामुळे अज्ञात संतप्त नागरिकांनी सदर क्रेनवर दगडफेक केली. याबाबतची माहिती कराड पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई सुरू केली आहे.

Related Articles