सातारा जिल्हाहोम

यशराज देसाई यांच्याकडून बाचोली, खळे, काढणे पूलांची पाहणी

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अनुपस्थितीत कर्तव्यदक्षता; पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांकडून कौतुक 

कराड/प्रतिनिधी : –

गेली तीन-चार दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व नद्या दुधडी भरुन वाहू लागल्या आहेत. तसेच नद्यांवरील पूल पुराच्या पाण्याखाली जाऊन वाहतूक विस्कळीत होत आहे. ढेबेवाडी भागातील वांग नदीवर असलेल्या बाचोली, खळे व काढणे या तीन पुलांची लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसान झालेल्या पुलांची व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पालकमंत्री शंभूराज देसाई हे मंत्रालयीन काममाजामुळे व्यस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत यशराज देसाई यांनी ढेबेवाडी भागात पाहणी दौरा करुन अधिकाऱ्यांकडून पुरपरिस्थितीची माहिती घेतली. पंजाबराव देसाई, शिवाजीराव शेवाळे, विलास गोडांबे, अनिल शिंदे, मनोज मोहिते, मधुकर पाटील, रणजित पाटील, सचिन पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, आरोग्य विभाग व पोलीस अधिकारी, तसेच विविध गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी उपस्थिती होते.

याप्रसंगी चेअरमन देसाई यांनी अतिवृष्टीच्या कालावधीत पुलावरुन पाणी वाहत असताना पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेटींग करुन वाहतूक तात्काळ बंद करावी, तसेच रात्री संबंधित पुलांवर बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही केल्या. तसेच महसूल विभागाने पुलावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात माहिती द्यावी.

गत चार दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना धणाच्या पाणीसाठयात झपाटयाने वाढ होत असून धरणात 63 टिएमसी पाणीसाठा झाला आहे. गत चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तारळी, उत्तर मांड धरण, मोरणा गुरेघर, वांग मराठवाडी, चिटेघर, महिंद या लहान-मोठया धरणांत पाण्यासाठयामध्ये मोठी वाढ झाली असून तारळी, उत्तर मांड, मोरणा, केरा, वांग या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन काही गावे काही काळासाठी संपर्कहिन झाली होती. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई हे तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत यशराज देसाई यांनी ढेबेवाडी भागात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित अधिकारी, ग्रामस्थांनाही त्यांनी विविध सूचना केल्या आहेत.

Show quoted text

Related Articles