कराडच्या पाणीप्रश्नासाठी साडेतीन कोटींची व्यवस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दखल; जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्याचे आदेश

कराड/प्रतिनिधी : –
कराडच्या पाणीप्रश्नासंबंधी पंपिंग स्टेशनची इलेक्ट्रिक मोटर आणि इतर कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून तात्काळ साडेतीन कोटी रुपयांचा निधी कराड नगरपालिकेला देण्यात यावा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिला आहे.
कराड शहराचा पाणीप्रश्न विजयसिंह यादव व माजी नगरसेवक सादिक इनामदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी तात्काळ सदरचा निर्णय घेतला आहे.
कराडच्या पाणी प्रश्नासंबंधी स्थानिक लोकप्रतिनिधी जितके संवेदनशील आहेत. तितकेच राज्यस्तरावरील नेतेही संवेदनशील झाले आहेत. सातारा येथील कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते. उपमुख्यमंत्री पवार यांना विजयसिंह यादव आणि सादिक इनामदार यांनी ब्भेतून कराडच्या पाणी प्रश्नासंबंधी असणारी अडचण सांगितली. याप्रसंगी चार दिवसांपासून जर पाणीप्रश्न निर्माण झाला, तर मला का लगेच सांगितले नाही? असा उलट प्रश्न अजितदादांनी केला. त्यांनतर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून जिल्हा नियोजन समितीमधून तात्काळ साडेतीन कोटी रुपये कराडच्या पाणी प्रश्नासाठी नगरपालिकेला देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असे आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकारी डुडी यांना दिला आहे.
कराडचा पाणीप्रश्न सोडवण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत विजयसिंह यादव, सातारा जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष, माजी नगरसेवक सादिक इनामदार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ पाटील-उंडाळकर यांनी चर्चा केली. यावेळी अजितदादा पवार यांनी तात्काळ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क करून जिल्हा नियोजन मंडळातून तात्काळ साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश दिल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.