सातारा जिल्हाहोम

औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी

ट्रकसह चालकाला अटक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 87 लाखांचा मुद्देमाल जप्त 

कराड/प्रतिनिधी : –

कराड-रत्नागिरी महामार्गावर कराड तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत औषधांच्या नावाखाली अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागांने शनिवारी ही धडक कारवाई केली. या कारवाईत सदरचा ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालकाला अटक केली आहे.

याप्रकरणी बनवारी राम असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून या कारवाईत त्याच्याकडून तब्बल 87 लाख 11  हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य (मुंबई), डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या पथकाला सदरची तस्करी होत असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने लोहारवाडी गावच्या हद्दीत ट्रक थांबवून झडती घेतली. यामध्ये  ट्रकमध्ये 87 लाख 11 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीच्या 15 हजार सीलबंद दारूच्या बाटल्या मिळाल्याने ट्रकचालक बनवारी राम याला अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी. आर. गायकवाड, जवान विनोद बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यांनी केली. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग कराडच्या दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील तपास करत आहेत.

Related Articles