कराड उत्तरच्या आमदारांचे वरतीमागून घोडे – मनोजदादा घोरपडे

कराड उत्तर / प्रतिनिधी : –
कराड उत्तरचे आमदार हे बिनकामांचे आमदार म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. गेली २५ वर्षे आमदारकी असताना त्यांनी कधीही विधान भवनामध्ये चकार शब्द काढलेला नाही. आमदार स्वतः साखरवाडी गावचा प्रश्न उपस्थित करतात. ही बाब हास्यास्पद आहे. आजपर्यंत तुम्ही या गावाला साधा रस्ता उपलब्ध करुन देवू शकला नाही, ही तुमची बिनकामाची पद्धत आहे. आज तुम्ही आरोग्याच्या विषयावर काम करण्याचा आभास निर्माण करत आहात. परंतु, आपले वरातीमधून घोडे चाललेले आहे, अशी टीका भाजपचे कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे यांनी केली.
मसूर येथे भाजपची विधानसभा निवडणूक तयारी आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, भरत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, गत १०वर्षे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण असे काम करताना आतापर्यंत १३ हजारपेक्षा जास्त लोकांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन केलेली आहेत. आणि तेवढ्याच लोकांना मोफत चष्मे वाटप केलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी सवलतीत शेती पंप वाटप करत आहोत. तर महिलांसाठी आटाचक्कीचे वाटप करत आहोत. सर्वच क्षेत्रात जनहिताचे काम केले आहे. तुम्ही आजपर्यंत असं कोणतंही काम केलेले नाही. जोपर्यंत तुमच्याकडे लोकं होती तोपर्यंत तुम्ही असं काही केलं नाही. आज तुमच्याकडे लोकंच नाहीत. त्यामुळे तुम्ही असे काम करायला सुरुवात केलेली आहे. परंतु तुम्ही आणलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आता लोकच उपलब्ध राहिलेली नाहीत. बिनकामाच्या आमदारांना आता जनता कंटाळली असून येणाऱ्या विधानसभेला जनता आपल्याला निश्चितच घरी बसवणार, असा टोलाही मनोजदादांनी लगावला. धैर्यशील कदम म्हणाले, कराड उत्तर मधून चांगले मतदान झाले असून येणाऱ्या विधानसभेला कराड उत्तरचा आमदार हा भाजपचा असेल त्यासाठी सर्वांनी मिळून कामाला लागावे. भरत पाटील म्हणाले, सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. सातारा लोकसभेला कराड उत्तरमधून चांगले मतदान झाले. यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे. देशाच्या अर्थसंकल्पात गोरगरिबांना सरकारने न्याय दिला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव काका पाटील, शंकरराव शेजवळ, चिन्मय कुलकर्णी, विठ्ठल बलशेटवार, सुनील शिंदे, अंजली जाधव, सीमा बर्गे, कराड बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, नवीन जगदाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र मोरे यांनी सूत्रसंचलन केले. गणेश घोरपडे यांनी आभार मानले.