सातारा जिल्हाहोम

कराडला क्रीडानगरी बनविण्यासाठी कटीबद्ध – डॉ. अतुलबाबा भोसले

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या प्रस्तावित विकास आराखड्याचे सादरीकरण

कराड/प्रतिनिधी : –

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आय.पी.एल.सारखे सामने व्हावेत. त्याचबरोबर क्रिकेटसह सर्व मैदानी खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे. ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांनी कराडचे नाव सातासमुद्रापार नेले. कराडचा नावलौकीक जगभरात व्हावा, यासाठी कराडला क्रीडानगरी बनविण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कराडमधील सौ. वेणुताई चव्हाण स्मृती सभागृहात स्टेडियमच्या प्रस्तावित विकास आराखड्याचे सादरीकरण व चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते.

येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने ९६.५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून होणाऱ्या कामांचा प्रस्तावित आराखडा ‘बेरी बिल्टस्पेस’चे व्यवस्थापकीय संचालक नितीश बेरी यांनी नागरिकांसमोर सादर केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट पीच व ग्राउंड, रात्रीच्या मॅचेससाठी लाईटची सोय, मैदानावर एकाचवेळी सुमारे २५ हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी अद्ययावत आसन व्यवस्था केली जाणार आहे. तसेच २ टेबल टेनिस कोर्ट, ४ बॅडमिंटन कोर्ट, कुस्ती आखाडा, खेळाडू व प्रशिक्षकांसाठी रुम्स, वॉर्म अप रुम, व्हॅलीबॉल कोर्ट, बास्केट बॉल कोर्ट, छोटे जीम, प्रशिक्षणासाठी हॉल अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे श्री. बेरी यांनी सांगितले.

या आराखड्याबाबत आपल्या सूचना मांडताना क्रिकेट प्रेमींसह ॲथलेटीक्स, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल तसेच अन्य क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्याऱ्या प्रशिक्षक व खेळाडूंनी आपापल्या सूचना मांडल्या. प्रस्तावित आराखड्यानुसार पावसाळ्यातही मैदान जलदगतीने सुकून सामने सुरु राहाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे. ॲथलेटीक्ससाठी स्वतंत्र सिंथेटीक ट्रॅक तयार केला जाणार आहे.

याप्रसंगी बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कराडला आय.पी.एल.सह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व्हाव्यात आणि कराडचा नावलौकीक व्हावा, अशी आपली अपेक्षा आहे. फुटबॉलसाठी व अन्य काही क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र स्टेडियम उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू. नागरिकांच्या मतांचा विचार करुन वाढीव निधीची गरज असल्यास आपण त्यासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, ऑलम्पिक स्पोर्टस् असोशिएशनचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, कोल्हापूर विभागीय शारिरीक शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. महेंद्र भोसले, क्रिकेटपट्टू डॉ. उमेश साळुंखे, कराड क्रिकेट मित्र परिवाराचे मंजित अत्तार, बॅडमिंटन प्रशिक्षक निलेश फणसळकर, स्केटिंग प्रशिक्षक योगेश लोंढे, तायक्वांदो प्रशिक्षक अमोल पालेकर, फुटबॉल प्रशिक्षक दीपक खटावकर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चंद्रकांत माने, धनुर्विद्या संघटनेचे तेजस लादे, रायफल शूटिंग खेळाडू सारंग थोरात, स्वाती पिसाळ, राष्ट्रीय खेळाडू डॉ. अमित माने, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, राष्ट्रीय कबड्डीपट्टू सचिन पाटील, ॲड. संभाजीराव मोहिते यांच्यासह खेळाडूंनी व नागरिकांनी सूचना मांडल्या.

स्टेडियमच्या उभारणीत योगदान देणाऱ्या कुटुंबांचा गौरव

डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्व. पी. डी. पाटील यांच्यासह स्टेडियमसाठी जागा देणाऱ्या स्व. ज्ञानदेवराव जाधव, स्व. मारुतीराव दिवटे, स्व. विष्णू कांबळे आणि स्व. संपतराव पवार यांच्यासह स्टेडियमच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांच्या कार्याचा गौरव केला. स्टेडियमसाठी चार दशकांपूर्वी जागा उपलब्ध दिल्याबद्दल स्व. जयवंतराव जाधव यांचे पुत्र आशुतोष जाधव व स्व. संपतराव पवार यांचे पुतणे अवि पवार यांचा डॉ. भोसले यांनी सत्कार केला. त्याचबरोबर स्टेडियमच्या पुनर्विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल शहरातील विविध मंडळे, नागरिक यांच्याकडून डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles