आयुष्यमान स्पेशलक्रीडाताज्या बातम्यासातारा जिल्हाहोम

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यामुळे कराडच्या क्रीडाप्रेमींची स्वप्नपूर्ती

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर; अतुलबाबांच्या प्रयत्नांना यश, क्रीडाप्रेमींच्या उत्साहाला उधान

कराड/प्रतिनिधी : – 

कराडच्या क्रीडा क्षेत्राला मोठी दैदिप्यमान परंपरा आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जडण-घडण झालेले अनेक खेळाडू आज राज्य व देशभरासह जागतिक स्तरावर ओळखले जातात. परंतु, सध्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेनुसार कराड शहरासह तालुक्यातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा व प्रशस्त स्टेडियमची उणीव भासत होती. याची दखल घेऊन कराड दक्षिणचे युवा नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासन दरबारी सततचा पाठपुरावा करून स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल ९६.५० कोटींचा निधी मंजूर आणल्याने क्रीडाप्रेमींची स्वप्नपूर्ती झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर विद्येचे माहेरघर म्हणून कराडची ओळख निर्माण झाली आहे. कराड शहर हे शिक्षणाबरोबरच वाहतूक, उद्योग-व्यवसाय, कृषी, पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातबरोबरच क्रीडा क्षेत्रासाठीही महत्त्वपूर्ण शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे कराड शहरासह तालुक्यातील
क्रीडाप्रेमींसाठी कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम म्हणजे एकप्रकारे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. परंतु, या ठिकाणी सध्या व्यवसायिक दृष्टिकोनातून लागणारे पीच, अत्याधुनिक सोयी-सुविधा, खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था, डे-नाईट सामन्यांची सोय, तज्ञ क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा साहित्य आदींच्या पूर्ततेसह कराडला देशपातळीवर सर्व सोयी-सुविधांनियुक्त आधुनिक क्रिकेट स्टेडियम व्हावे, अशी सर्व क्रीडाप्रेमी, युवक, नागरिकांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती.

युवक, क्रीडाप्रेमी, नागरिकांची इच्छा लक्षात घेऊन याच स्टेडियमवर जानेवारी महिन्यात सहकारमहर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती. यावेळी ना. देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना कराडच्या स्टेडियमचा नवा विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.

ना. फडणवीस यांच्या सूचनेनुसार डॉ. भोसले यांनी स्टेडियमचा सर्व सोयी-सुविधांयुक्त अत्याधुनिक आराखडा तयार करून राज्य शासनाकडे सादर केला होता. तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल ९६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा महायुती सरकारने नुकतीच केली आहे. तसेच नगरविकास विभागाच्यावतीने नुकताच सदरचा शासन निर्णयही प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामुळे आता कराडच्या स्टेडियमच्या कायापालट होणार असल्याने येथील क्रीडाप्रेमींच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह महायुती सरकारच्या या निर्णयाचे मोठा जल्लोषात स्वागत केले आहे.

विधानसभेचा मार्ग सुकर 

सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणतेही मोठे पद नसतानाही आतापर्यंत शेकडो कोटींचा विकास निधी आणण्यात डॉ. अतुलबाबा भोसले यांना यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निर्णायक आघाडी मिळवून देत त्यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला. ही बाब डॉ. भोसले यांच्या पथ्यावर पडली असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुलबाबांच्या मागणीनुसार कराडच्या स्टेडियमसाठी भरघोस विकासनिधी दिल्याने कराड शहरातून डॉ. अतुलबाबा भोसले यांना विधानसभा निवडणूकीमध्ये मोठे मताधिक्य मिळणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसून येत आहे.

स्टेडियमच्या उभारणीबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता 

कराडच्या स्टेडियमसाठी नगरपरिषदांना वैशिष्टपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून, तेथे खेळाडूंसाठी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात तालुकास्तरावर असणाऱ्या स्टेडियममध्ये सर्वात मोठे आणि सर्वप्रकारच्या सुविधा असणारे पहिले स्टेडियम म्हणून कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ओळखले जाणार आहे. यामुळे नवीन स्टेडियमच्या उभारणीबाबत क्रीडाप्रेमींना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

क्रीडाप्रेमींनी साजरी केली दिवाळी 

कराडमधील छ. शिवाजी महाराज स्टेडियममध्ये १९८५ पासून ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण चालू आहे. तसेच या स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामनेही झाले आहेत. या स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. हे स्टेडियम केवळ शहरातीलच नव्हे; तर ग्रामीण भागातील खेळाडूंनाही उपयुक्त आहे. या स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुढाकार घेत, शासनाकडून तब्बल ९६.५० कोटींचा निधी मंजूर करवून आणल्याबद्दल क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर विकासनिधीची घोषणा होतच क्रीडाप्रेमींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच महायुतीतील घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही लाडू वाटप करून, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून एकप्रकारे दिवाळीच साजरी केल्याचे दिसून आले.

टीकेला कृतीतून उत्तर 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जानेवारी महिन्यात भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवाच्या उभारणीमध्ये अनेक कृषी स्टॉल, भव्य व्यासपीठ आणि कृषी चर्चासत्रासाठी मंडप उभारण्यात आला होता. परंतु, स्टेडियमसारख्या ठिकाणी अन्य कार्यक्रम घेऊन स्टेडियमची नासधूस केल्याची टीका त्यावेळी करण्यात आली होती. परंतु, डॉ. अतुलबाबा भोसले यांनी टीकाकारांना आपल्या कृतीतून उत्तर देत स्टेडियमचाच कायापालट घडवून आणण्यात महत्वाची भूमिका निभावल्याने आपसूकच टीकाकारांची तोंडे बंद झाल्याचे दिसून येत आहे.

स्टेडियम ठरणार कराडची नवी ओळख

कराड शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक, सर्व सोयींनियुक्त
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममुळे कराड शहर क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने राज्यासह देशभराच्या नकाशावर येणार आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी रणजी सामने, तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातूनही क्रीडा सामने भरवणे शक्य होणार असल्याने कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे कराड शहराची नवी ओळख बनेल, यात शंका नाही.

कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. याबाबत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडे निधीची मागणी केली. अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी आपला शब्द पूर्ण करत, स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.
– डॉ. अतुलबाबा भोसले

(प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप)

Related Articles