ताज्या बातम्यासातारा जिल्हाहोम

कोयना धरणात 38.58 टीएममसी पाणीसाठा

नवजाला 185 मिलिमीटर पावसाची नोंद, महिंद धरण ओव्हरफ्लो, अनेक पुल पाण्याखाली 

कराड/प्रतिनिधी : –

रविवारी सकाळपासून कराड व पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक 64 हजार क्युसेक झाली असून धरणातील पाणीसाठा 38.58 टीएमसी झाला आहे.

दरम्यान, जुलै महिन्याच्या तेरा तारखेपर्यंत कराड व पाटण तालुक्यात पावसाची सुमार कामगिरी राहिली आहे. त्यामुळे काही ठिकाणचा अपवाद वगळता खरिपाची पिके वाया जाण्याची भीती, तसेच दुबार पेरणीचे संकट शेतकरी वर्गातून वर्तवले जात होते. परंतु, जुलै महिन्याच्या चौदा तारखेला रविवारी कराड व पाटण तालुक्यातील हवामानात चांगला बदल झाला असून सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.

कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 64 हजार क्युसेक झाली असून धरणातील पाणीसाठा 38.58 टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दोन हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. पाणलोट क्षेत्रात केवळ सहा तासात कोयनानगर 122 (1917 मिमी), नवजा 185 (2210 मिमी), महाबळेश्वर 52 (1705 मिमी) पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 38 हजारवरून सहा तासात 64 हजार क्युसेक झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल पाच टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या 38.58 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

रविवारी सकाळपासून पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे ढेबेवाडी भागातील महिंद धरणात पावसाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने याच परिसरातील शितपवाडी येथील पूल पाण्याखाली गेला होता.

दरम्यान, हवामान विभागाने सोमवार व मंगळवारी सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे धरणासह नद्या व ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles