कराडात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा
राधाकृष्ण मंदिरात अभिषेक, भजन-कीर्तनाने रंगली भक्तिमय रात्र; मध्यरात्री जन्मकाळाचा सोहळा
कराड/प्रतिनिधी : –
‘नंदघरी आनंद झाला, श्रीकृष्ण जन्माला आला…’ या जयघोषाने पंचवटी, सोमवार पेठ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भक्तिमय वातावरणात शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध धार्मिक विधी, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद लुटला.
वेदशास्त्रसंपन्न डॉ. विनायक गरुड यांच्या राधाकृष्ण मंदिर, विद्यामोहन पूजा हॉल, पंचवटी, सोमवार पेठ येथे जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी उत्सवमूर्तीला दुग्धाभिषेक, पवमान अभिषेक, तसेच विधिवत पूजन करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण राहिले.
सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. रात्री ह.भ.प. सुनीलबुवा काणे (कोरेगाव) यांची भावपूर्ण कीर्तनसेवा झाली. त्यांच्या कीर्तनातून श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, भक्ती आणि कर्मयोगाचे महत्त्व उलगडण्यात आले. रात्री १२.३० वाजता श्रीकृष्ण जन्मकाळाचा मंगलमय सोहळा पार पडला. जन्मकाळ होताच ‘नंदघरी आनंद झाला, श्रीकृष्ण जन्माला आला’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
भाविकांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेत भक्तिभावाने नामस्मरण व भजन केले. यावेळी उपस्थित भाविक भक्तिरसात चिंब झाले. शनिवारी गोपाळकाल्याचे आयोजन करून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची सांगता करण्यात आली. अनेक वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव याहीवर्षी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
