आर्वीच्या जनता दरबारात २५० तक्रारी, बहुतांश प्रश्न जागेवरच निकाली
आ. मनोज घोरपडे यांच्या पुढाकाराला प्रतिसाद; ३४ जणांना शिधापत्रिका, १४ महिलांना साडी वाटप

कराड/प्रतिनिधी : –
नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आर्वी (ता. कोरेगाव ) येथे आमदार मनोज घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय विभागांशी संबंधित २५० हून अधिक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. त्यापैकी बहुतांश तक्रारींचा संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच निपटारा करण्यात आला.
महसूल, पुरवठा, महावितरण, जलसंपदा, आरोग्य, वनविभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामविकास, पाणीपुरवठा, कृषी आणि शिक्षण विभागांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. उर्वरित तक्रारींची प्रशासकीय नोंदी तपासून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार घोरपडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जनता दरबारासाठी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार संगमेश कोंडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, भूमी अभिलेख अधिकारी संजय कदम यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता आल्या.
यावेळी ३४ नवीन लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच अंत्योदय योजनेअंतर्गत १४ लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करणे, हा जनता दरबाराचा मुख्य उद्देश आहे. प्रशासनाने नागरिकांप्रती संवेदनशील राहून काम करावे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत भविष्यातही अशा जनता दरबारांचे आयोजन करण्यात येईल.
यावेळी ज्येष्ठ नेते शंकर पाटील, तात्यासाहेब साबळे, श्वेताताई गायकवाड, सोमनाथ निकम फौजी, भगवान कदम, कृष्णत शेडगे मामा, अमोल कदम, श्रीकांत माळी, सिताराम गायकवाड आप्पा, कल्याण जाधव, उद्धव जाधव, सचिन इंगळे, वीरेंद्र डोंबे, सतीश जाधव, चंद्रकांत गायकवाड, विघ्नेश पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



