सातारा जिल्हाहोम

कृष्णा विश्व विद्यापीठात २० जुलैपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस आणि कृष्णा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २० व २१ जुलै रोजी कृष्णा विश्व विद्यापीठात ‘के.व्ही.व्ही.आय.एन.एस. स्पाईन कॉन-२०२६’ या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे व प्रत्यक्ष शस्त्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कंबरेच्या मणक्याविषयी ३६० अंशांचा सर्वांगीण दृष्टिकोन’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत देशविदेशातील नामवंत स्पाईन सर्जन सहभागी होणार असून, ते तरुण स्पाईन सर्जनना आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रांचे प्रशिक्षण देणार आहेत.

या परिषदेबाबत अधिक माहिती देताना आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. जी. व्ही. रामदास म्हणाले, की कंबरदुखी ही आज जगभरातील सर्वाधिक त्रासदायक आणि अपंगत्व निर्माण करणाऱ्या आजारांपैकी एक आहे. या आजारात अनेक रुग्ण औषधे, फिजिओथेरपी, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल यांचा आधार घेतात. ज्यातून बहुतेक रुग्णांना आराम मिळतो. पण काही रुग्णांमध्ये मज्जातंतूंवर दाब येणे, पायात कमजोरी येणे, असह्य वेदना किंवा मणक्याची अस्थिरता निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया आवश्यक ठरते.

पूर्वी मणक्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे मोठी जखम, जास्त रक्तस्राव, अनेक दिवस रुग्णालयात राहावे लागणे आणि दीर्घ विश्रांती अशी भीती लोकांच्या मनात होती. पण गेल्या दोन दशकांत वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतिकारी प्रगतीमुळे ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आधुनिक दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपिक) शस्त्रक्रिया, उच्च प्रतीची मायक्रोस्कोपी, अत्याधुनिक इम्प्लांट्स, प्रगत इमेजिंग प्रणाली आणि सुरक्षित भूलतंत्रामुळे आज मणक्याच्या अनेक शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितपणे आणि अधिक अचूकतेने करता येतात.

या आधुनिक शस्त्रक्रियांमुळे कमी रक्तस्राव, कमी वेदना, संसर्गाचा धोका कमी, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी राहतो आणि रुग्ण लवकर चालू लागतो. अनेक रुग्ण तर शस्त्रक्रियेनंतर काही तासातच चालू शकतात. या नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण तरुण स्पाईन सर्जनना मिळावे, यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्याख्याने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles