सातारा जिल्हाहोम

जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्र

साताऱ्यासह पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात १० नवीन शाखांना मंजुरी

कराड/प्रतिनिधी : –

येथील सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेला आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपला कार्यविस्तार करण्यास सहकार खात्याकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच साताऱ्यासह पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवीन १० शाखा सुरू करण्यासही मंजुरी मिळाल्याने, पतसंस्थेच्या विस्ताराला नवे बळ प्राप्त झाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ मिळवून देण्याच्या उद्देशाने २४ एप्रिल २००१ रोजी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराडमध्ये सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. सुरवातीच्या काळात सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेने सांगली जिल्ह्यातही सुमारे ३० शाखांच्या माध्यमातून आपला कार्यविस्तार केला. संस्थेने नुकतेच आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले असून, गेल्या २५ वर्षांत दर्जेदार व विश्वासार्ह बँकिंग सेवा देत, सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त केला आहे.

आपल्या सक्षम व्यवस्थापनामुळे आणि काटेकोर आर्थिक शिस्तीमुळे या पतसंस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून, सहकार खात्याने या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश सहकारी संस्थांचे अपर निबंधक मिलिंद भालेराव यांनी शुक्रवारी (ता. १७) पारित केला. तसेच पतसंस्थेला नवीन १० शाखा सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सातारा जिल्ह्यात लोणंद व शिरवळ येथे, पुणे जिल्ह्यात वाकड येथे, कोल्हापूर जिल्ह्यात पेठवडगाव येथे; तर सांगली जिल्ह्यात विटा, शिराळा, तासगाव, कुंडल, आष्टा व चिंचणी येथे पतसंस्थेच्या नवीन शाखा सुरु केल्या जाणार आहेत.

या नवीन शाखांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिला बचत गट, नोकरदार वर्ग आणि लघुउद्योजकांना संस्थेच्या विविध आर्थिक सेवा सहज उपलब्ध होणार आहेत. तसेच ठेवी, कर्ज सुविधा, बचत योजना तसेच इतर वित्तीय सेवांचा लाभ आता अधिक व्यापक स्तरावर मिळणार असल्याचे पतसंस्थेचे संस्थापक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. पतसंस्थेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles