लायन्स क्लब ऑफ कराड मेनच्या अध्यक्षपदी संदीप पवार

कराड/प्रतिनिधी : –
लायन्स क्लब ऑफ कराड मेनच्या सन 2026-27 या वर्षासाठी अध्यक्षपदी संदीप पवार, सचिवपदी रमेश कांबळे आणि खजिनदारपदी संतोष माने यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शनिवार, दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता हॉटेल पंकज, कराड येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी पदप्रदान अधिकारी म्हणून पुणे प्रांताचे माजी प्रांतपाल ला. गिरीश मालपानी PMJF उपस्थित राहणार आहेत. तसेच शपथप्रदान अधिकारी म्हणून सातारा मासचे अध्यक्ष धैर्यशील भोसले MJF यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय रीजन चेअरमन महेंद्र कदम MJF व झोन चेअरमन खंडू इंगळे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
लायन्स इंटरनॅशनल ही जगातील अग्रगण्य सामाजिक सेवा संस्था असून तिचे जगभरात 14 लाखांहून अधिक सदस्य कार्यरत आहेत. सेवा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या तत्त्वांवर कार्य करणाऱ्या या संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लायन्स क्लब ऑफ कराड मेनची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
लायन्स इंटरनॅशनलच्या परंपरेनुसार दरवर्षी नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित केला जातो. त्यानुसार यंदाचा पदग्रहण समारंभ दि. 18 जुलै रोजी उत्साहात पार पडणार असून क्लबचे सर्व सदस्य, माजी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती क्लबतर्फे देण्यात आली आहे.


