शरद पवारांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास, पक्षांतराचा प्रश्नच नाही – अविनाश मोहिते
सोशल मीडियावरील दावे फेटाळले

कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षांतराबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, पक्ष बदलण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
मोहिते यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुमारे दहा वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश केला होता आणि आजही त्याच पक्षात कार्यरत आहे. पवार कुटुंबाशी आमच्या कुटुंबीयांचे अनेक दशकांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू असून, २१ जून रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी दि. ९ जून रोजी दिवसभर आपण घरी, तसेच दुपारनंतर संस्थापक पॅनेलच्या प्रचारात व्यस्त होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून आपण मुंबईलाही गेलेलो नसल्याने इतर कोणत्याही पक्षात प्रवेश केल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आणि आपल्या कुटुंबीयांचा संपूर्ण वेळ प्रचारासाठी खर्च होत असल्याचे सांगताना, विरोधकांनी किंवा अन्य कोणीतरी जाणीवपूर्वक अथवा गैरसमजातून पक्षांतराबाबतची दिशाभूल करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली असावी, असा आरोपही त्यांनी केला. आपण शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जनतेसोबत ठामपणे उभे असून, पुढेही त्याच भूमिकेत राहणार असल्याचा पुनरुच्चार अविनाश मोहिते यांनी केला आहे.


