आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

कोयनानगरात राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर पत्रकारांना मार्गदर्शन

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने आयोजन

 

कोयनानगर / प्रतिनिधी : –

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेला कोयनानगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. संस्थेचे  विश्वस्त  गणेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारितेची दिशा, डिजिटल युगातील आव्हाने आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभाव या विषयांवर यावेळी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक व प्रदेश सरचिटणीस अरविंद जाधव हे होते

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, राज्याध्यक्ष दिनकर पतंगे, बाळकृष्ण कासार, सत्यवान विचारे, महेश सूर्यवंशी, सुनील कदम यांच्यासह विविध जिल्ह्यांतून आलेले पदाधिकारी, पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बातमी संकलनातील नवीन पद्धती, डिजिटल माध्यमांची वाढती व्याप्ती तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेमध्ये होत असलेले बदल याविषयी मार्गदर्शन केले. एआयच्या माध्यमातून बातम्यांचे विश्लेषण, माहिती संकलन, भाषांतर आणि माहितीची पडताळणी यांसारख्या बाबी अधिक परिणामकारकपणे करता येत असल्याचे सांगत पत्रकारांनी या नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून काळानुरूप स्वतःला सक्षम बनविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

पत्रकारितेची विश्वासार्हता जपत आधुनिक साधनांचा योग्य वापर करणे ही काळाची गरज असल्याचे मत केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील पत्रकारांपर्यंत नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोहोचावी आणि पत्रकारांचे कौशल्यवर्धन व्हावे या उद्देशाने अशा कार्यशाळांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Articles